Gold Price today : धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त जसजसा जवळ येत आहे, तसतशी ग्राहकांमध्ये सोनं आणि चांदी खरेदीसाठी उत्सुकता वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्याने सामान्य ग्राहकांची चिंता वाढली होती. सोनं जीएसटीसह प्रति तोळा 1,35,000 रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे अनेकांनी खरेदी थांबवली होती.
पण, आता धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे बाजारात खरेदीसाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे. या घसरणीमुळे ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
Gold Price today सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची घसरण
जळगावच्या मार्केटमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात तब्बल 3,000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1,32,000 रुपये प्रति तोळा इतके झाले आहेत.
चांदी झाली 8,000 रुपये स्वस्त
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. चांदीच्या दरात 8,000 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर 1,78,000 रुपयांवरून थेट 1,70,000 रुपये प्रति किलोवर आले आहेत.
खामगावच्या बाजारपेठेत चांदीचे आजचे भाव
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे राज्यातील एक प्रमुख चांदीचे बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. येथे धनत्रयोदशीनिमित्त मोठ्या प्रमाणात चांदी खरेदी केली जाते. आज खामगावच्या बाजारपेठेतही चांदीच्या दरात घट दिसून आली. खामगाव येथे आजचे चांदीचे भाव जीएसटीसह प्रति किलो 1,72,000 रुपये आहेत. गेल्या आठवड्यात हेच दर 1,90,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले होते.
सोने-चांदीच्या दरात आणखी तेजी येणार?
दरम्यान, या घसरणीनंतरही सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची होणारी खरेदी, भू-राजकीय तणाव आणि आशियातील मोठी मागणी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी कायम राहू शकते. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या अहवालानुसार, औद्योगिक क्षेत्रातील मागणी आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळे चांदीचे दरही वाढू शकतात.
या अहवालानुसार, जागतिक अस्थिरता आणि केंद्रीय बँकांकडून सोन्याचा साठा वाढवला जात असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. भारतात सोन्याचे दर 1,35,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, तर चांदीचे दर आगामी काळात 2,30,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, धनत्रयोदशीच्या निमित्ताने झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांना सध्या खरेदी करण्याची चांगली संधी मिळाली आहे.